बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे निर्जन रस्त्यावर रात्रीच्या अंधारात अर्धवट जळालेला मृतदेह पडला होता. मोबाईलच्या लाईटमध्ये काही पोलीस अधिकारी घटनास्थळी पाहणी करत होते. या क्रूर घटनेमागचं रहस्य अनेकांच्या अंगावर काटा आणणारे होते. ज्यावर बंगळुरूतील लोकांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. जो अज्ञात मृतदेह निर्जन रस्त्यावर पडलेला सापडला तो अवघ्या १३ वर्षीय मुलाचा होता. ज्याचे ना कुणी शत्रू होते, ना कुणाशी वाद होता. मग ही हत्या कुणी केली हा प्रश्न उभा राहिला. या मुलाच्या हत्येचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान बनले.
बंगळुरूतील वैश्य बँक कॉलनीतील शांतिनिकेतन ब्लॉकमध्ये राहणारा आठवीतील विद्यार्थी निश्चित ए हा रोजच्या सारखं ३० जुलैला संध्याकाळी ५ वाजता घरातून ट्यूशनला जाण्यासाठी निघाला होता. तो रात्री साडे सात वाजता घरी परततो, परंतु जेव्हा रात्री ८ वाजले आणि मुलगा घरी आला नाही, तेव्हा कुटुंबाला चिंता लागली. घरच्यांनी मुलाचा शोध सुरू केला. ट्यूशनमधून वेळेत तो निघाल्याचे टीचरने सांगितले. त्यामुळे घरच्यांची चिंता आणखी वाढली. कुटुंबाने तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनीही गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. त्याचवेळी फॅमिली पार्कजवळ बेवारस अवस्थेत मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी ट्यूशन ते घर या रस्त्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा एका दुचाकीस्वारासोबत जाताना दिसला. हा दुचाकीस्वार कोण होता हे स्पष्ट दिसत नव्हते. परंतु रात्री १ वाजता या कहाणीत मोठा ट्विस्ट आला. घरच्यांना अज्ञात नंबरवरून खंडणीसाठी एक फोन आला. फोन करणाऱ्याने मुलगा सुखरुप असून त्याला सोडण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. घरच्यांनी पैशांची जुळवाजुळव करतो असं सांगितले, तेव्हा लोकेशनबाबत नंतर फोन करतो असं सांगत अपहरणकर्त्यांनी फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अपहरणकर्त्यांनी निश्चितच्या घरच्यांना ५ लाख रुपयांसह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकण्यास मजबूर केले. घरच्यांचा प्रयत्न सुरू होता त्यात अपहरणकर्त्यांचा फोन स्विच ऑफ झाला.
मात्र ३१ जुलैच्या संध्याकाळी साडे पाच वाजता मुलाचा मृतदेह सापडला. निश्चितचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत निर्जन रस्त्यावर पडला होता. या घटनेत पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, हे गुन्हेगार कगलीपुरा परिसरात लपले होते. पोलिसांनी धरपकड करत आरोपींना सरेंडर करण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना २ गुन्हेगारांना गोळी लागली. यातील इतर दोघांना पोलिसांनी पकडले. परंतु त्या आरोपींची चौकशी केली असता त्यातून या घटनेमागे आणखी एक कहाणी समोर आली.
चौकशीत वेगळेच सत्य समोर
गुरुमूर्ती आणि गोपीकृष्ण असं २ आरोपींची नावे होती, त्यातील गुरुमूर्ती कधीकाळी मुलाच्या घरी वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याला मुलाच्या कुटुंबाची माहिती होती. गुरुमूर्ती मुलाच्या आईला ८ महिन्यापासून ओळखत होता. मुलाची आई सविताने एका APP च्या माध्यमातून कार बुक केली होती, जी गुरुमूर्ती चालवत होता. त्यावेळी गुरुमूर्तीने जर तुम्हाला ड्रायव्हरची गरज असेल तर मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता असं सांगितले. त्यानंतर ड्रायव्हर म्हणून तो बऱ्याचदा मुलाच्या घरी गेला. त्याची आणि मुलाची ओळख झाली. घटनेच्या दिवशी त्याने मुलाला पाणीपुरीचं आमिष दाखवून अपहरण केले आणि मुलाच्या घरच्यांना ५ लाखाची मागणी केली. परंतु मुलाच्या हत्येमागे अपहरण आणि खंडणी हेतू होता की अन्य काही या अँगलने पोलीस तपास करत आहे.