तिरुपती: आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून महिलेनं पतीची हत्या केली आहे. आरोपी वसुंधरानं तिच्या ५३ वर्षीय पतीची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीचं शिर घेऊन तिनं पोलीस ठाणं गाठलं आणि आत्मसमर्पण केलं.
तिरुपतीच्या रेनीगुंटामध्ये वास्तव्यास असलेल्या ५० वर्षीय वसुंधरा यांनी ५३ वर्षीय पती रवीचंद्रनची हत्या केली. २५ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना २० वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर ते रेनीगुंटामधल्या बुग्गा स्ट्रिट परिसरात राहात होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात भांडणं व्हायची. गुरुवारी रात्रीदेखील रवीचंद्रन आणि वसुंधरा यांच्यात वाद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा यांनी गुरुवारी सकाळी रवीचंद्रन यांच्यावर चाकूनं अंदाधुंद वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वसुंधरा यांनी पतीचं शिर कापून ते प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं. रिक्षा पकडून त्या पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि आत्मसमर्पण केलं.
पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजलेलं नाही. त्यांचा तपास सुरू आहे. रविचंद्रन यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय वसुंधरा यांना होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे.