मुंबई : विम्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेची प्रत देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने पाचशे रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगताच उपनिरीक्षकाने त्याच्याकडून पोलीस ठाण्यासाठी स्टेशनरीच्या वस्तू देण्यास सांगितल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईतून समोर आली आहे़ या प्रकरणी एसीबीने पोलीस उपनिरीक्षक दिलीप तुकाराम पवार (३२), पोलीस शिपाई सर्जेराव आसाराम पुंगळे (३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यांच्या कारचा अॅक्सल तुटल्याने कार दुभाजकाला धडकली. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात किरकोळ अपघाताची नोंद करण्यात आली. विम्यासाठी त्यांनी, या नोंदीची प्रत मिळावी म्हणून पवारकडे धाव घेतली. पवारने या कामासाठी त्यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगताच, पवारने त्यांना दोनशे रुपये किमतीचे एक रिप पेपर आणि पोलीस ठाण्यासाठी लागणाºया स्टेशनरीची मागणी केली.त्यांनी याबाबत थेट एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचला. शुक्रवारीच दोनशे रुपये किमतीचे एक रिप पेपरसह १७० रुपयांच्या झेरॉक्सच्या प्रती काढून घेतल्या. या वेळी पुंगळेने झेरॉक्स स्वीकारण्यास मदत केली. दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सामान स्वीकारताना त्यांच्यासोबत पुंगळेंनाही रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. स्टेशनरीच्या वस्तू लाचेत मागण्याची वेळ पोलिसांवर ओढावणे हे खेदजनक असल्याच्या टीकाही सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
पैसे नसल्यास पोलीस ठाण्यासाठी स्टेशनरी द्या, पोलीस अधिकाऱ्याकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 03:42 IST