लखनौ - "हॅलो, मी तुझ्या पतीची दुसरी बायको बोलत आहे..." या वाक्याने २५ वर्षीय विवाहित महिलेचा जीव घेतला आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात जलालपूर गावातील ही घटना आहे. जिथे एका महिलेला पतीने दुसरे लग्न केल्याचे सहन झाले नाही. तिला इतका तीव्र झटका लागला की बस प्रवासात आईच्या मांडीवर डोके ठेऊन तिने जगाचा निरोप घेतला.
या महिलेचे नाव रिटा असून अडीच वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. माहितीनुसार, मंगळवारी तिच्या पतीच्या मोबाईलवरून एक फोन आला होता. दुसऱ्या बाजूने अज्ञात महिलेचा आवाज ऐकू लागला. तिने मी तुझी सवत बोलतेय, तुझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न केले असं या महिलेने रिटाला सांगितले. अचानक हे ऐकून रिटा अस्वस्थ झाली. तिला काहीच कळायचे बंद झाले. पतीच्या दुसऱ्या लग्नाचे ऐकून रिटाला मोठा धक्का बसला. त्यातच तिने प्राण सोडले.
काय आहे प्रकरण?
अडीच वर्षापूर्वी रिटाचं लग्न शैलेंद्र नावाच्या युवकाशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी रिटाला टीबी असल्याचं समोर आले, त्यानंतर ती उपचारासाठी तिच्या आई वडिलांच्या घरी परतली. ती बरी झाल्यानंतर पुन्हा सासरी आली परंतु रिटाच्या मागचा त्रास संपला नव्हता. मे महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ती माहेरी गेली होती. यावेळी पती-पत्नी यांच्यातील दुरावा वाढला. रिटा तिची आई आणि भाऊ यांच्यासोबत दिल्लीत राहू लागली. रिटा दिल्लीत राहत होती, तेव्हा तिच्या मोबाईलवर पतीच्या मोबाईलवरून फोन आला.
रिटा आणि तिची आई बसमध्ये होत्या. अचानक पतीच्या मोबाईलवरून अज्ञात महिलेचा आवाज आला, तिने म्हटलं, मी तुझी सवत बोलत आहे. हे ऐकून रिटा घाबरली. ती सासरी जायला निघाली होती. सोबत आई आणि भाऊही होते. दिल्लीतून जलालपूरला जाणारी बस पकडली होती. परंतु रस्त्यातच तिची तब्येत बिघडली. पतीच्या दुसऱ्या लग्नाचा तिने धसका घेतला होता, त्यातून ती स्वत:ला सावरू शकली नाही. संपूर्ण प्रवासात ती आईच्या मांडीवर डोके ठेऊन जात होती. अचानक एका गावाजवळ तिची तब्येत जास्तच बिघडली आणि तिने बसमध्येच अखेरचा श्वास घेतला. या घटनेबाबत रिटाच्या भावाने पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.