तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने तिच्या पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये महिलेचा सहा महिन्यांपूर्वीच कुटुंबियांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता.
देविका असं या महिलेचं नाव आहे. ती विकाराबाद जिल्ह्यातील रहिवासी होती आणि एमबीए पूर्ण केल्यानंतर हाय-टेक सिटीमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. तिथे तिची सतीशशी भेट झाली, ज्याने आयआयटी खरगपूरमधून शिक्षण पूर्ण केलं होतं आणि तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.
पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या आईने तिच्या तक्रारीत जावयाने मुलीच्या नावावर असलेल्या नोंदणीकृत घराची मालकी स्वतःकडे हस्तांतरित करण्यासाठी मुलीवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. मुलीला छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
महिला आणि तिचा पती दोघेही एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते आणि गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री टीव्ही रिमोटवरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पती घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला त्याची पत्नी मृतावस्थेत आढळली, जिने तिच्या खोलीत गळफास घेतला होता.
महिलेच्या कुटुंबीयांनी माध्यमांना सांगितलं की, तिचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करत होता. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. कुटुंबाच्या तक्रारीवरून सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.