दिल्लीत पार्किंगच्या वादातून झालेल्या हत्येने परिसर हादरून गेला आहे. ४२ वर्षीय आसिफ कुरेशी याची हत्या झाली आहे. आसिफ बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आहे. दिल्लीतील निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पार्किंगच्या वादातून गुरुवारी रात्री अभिनेत्रीच्या भावाची हत्या झाली. गेटवरून स्कूटी काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. या वादात आरोपींनी आसिफवर हल्ला केला.
घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं हे आता आसिफच्या पत्नीने सांगितलं आहे. "माझा नवरा दारात उभा होता. शेजारच्या मुलाने त्याची स्कूटर गेटसमोर उभी केली. माझ्या नवऱ्याने फक्त म्हटलं, बेटा, थोडी पुढे गाडी लाव म्हणजे रस्ता मोकळा राहील. यावर तो मुलगा शिवीगाळ करत, धमकी देत वरच्या मजल्यावर गेला. थोड्या वेळाने तो त्याच्या भावासोबत खाली आला आणि माझ्या नवऱ्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. रक्त येऊ लागलं, मी माझ्या दिराला फोन केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता."
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
"आसिफला इतकी खोल जखम झाली होती की रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याआधीही या लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण माझा नवरा म्हणाला होता की जाऊदे, सोडून दे, प्रकरण शांत करु. आता त्याचा परिणाम असा झाला आहे की, मी विधवा झाली आहे. माझा नवरा चिकन सप्लायमध्ये काम करायचा, तो कष्ट करून घर चालवायचा. माझी एकच मागणी आहे की, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून दुसऱ्या कोणाचंही घर असं उद्ध्वस्त होऊ नये."
आसिफचा भाऊ जावेदने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजता वहिनीचा फोन आला आणि ती म्हणाली की, आसिफवर हल्ला झाला आहे आणि त्याची प्रकृती खूप वाईट आहे. मी ताबडतोब माझं दुकान सोडून घरी आलो. पण मी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. भांडण फक्त पार्किंगवरून होतं, पण आरोपींनी आधीही याच मुद्द्यावरून त्याच्याशी दोन-तीन वेळा भांडण केलं होतं. आधीच्या भांडणात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती, जेणेकरून प्रकरण वाढू नये. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.