विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू, नणंदेस आजन्म कारावास; उदगीर येथील न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 23:39 IST2022-04-27T23:39:07+5:302022-04-27T23:39:13+5:30
उदगीर येथील किल्ला गल्लीतील स्नेहा सुरेंद्र चव्हाण यांना पती सुरेंद्र, सासू राजराणी चव्हाण व नणंद सुधारूपी बयास यांनी करणीधरणीसाठी त्रास देत असत.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू, नणंदेस आजन्म कारावास; उदगीर येथील न्यायालयाचा निकाल
उदगीर (जि. लातूर) : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू व नणंदेस आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एन. के. मनेर यांनी मंगळवारी सुनावली आहे.
उदगीर येथील किल्ला गल्लीतील स्नेहा सुरेंद्र चव्हाण यांना पती सुरेंद्र, सासू राजराणी चव्हाण व नणंद सुधारूपी बयास यांनी करणीधरणीसाठी त्रास देत असत. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत असत. आरोपी सुरेंद्र यास व्यवसायासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून ६ जुलै २००८ रोजी रात्री ७.३० वा.च्या सुमारास विवाहिता स्नेहा चव्हाण हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. घटना घडल्यानंतर स्नेहा चव्हाण यांचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यात आला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान धबडगे यांनी करून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याआधारे पती सुरेंद्र चव्हाण, सासू राजाराणी चव्हाण, नणंद सुधा बयास यांना कलम ३०२ प्रमाणे आजन्म कारावास व २५ हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्या. एन. के. मनेर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. जी. सी. सय्यद यांनी काम पाहिले.