लखनौ - शहरातील पकरा बाजार परिसरात एका दारूड्या पतीने रागाच्या भरात पत्नीची क्रूर हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. सीमा असं मृत महिलेचे नाव नाहे. रवी आणि सीमा यांचे लग्न ६ वर्षापूर्वी झाले होते. त्यांना ८ वर्षीय पायल आणि ४ वर्षीय पलक नावाच्या २ मुली आहेत. रवी सासू सासऱ्यांसोबत चंदीगड येथे मजुरीचे काम करतो. २४ जुलैला तो गावी आला होता. रवीला खूप दिवसांपासून दारूचे व्यसन होते. त्यामुळे दररोज त्याची बायकोसोबत भांडणे व्हायची.
रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास रवीने घरात मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवली. त्यावेळी रवी आणि सीमा यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. हा वाद इतका वाढला की रवीने गाण्यांचा आवाज आणखी वाढवला आणि अचानक घरात असणारी वीट उचलून सीमाच्या डोक्यात मारली. एकापाठोपाठ एक हल्ला झाल्याने सीमा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली. हे दृश्य पाहून रवी अनवाणीच घरातून पळून गेला.
आईची अवस्था पाहून मुलींना कोसळलं रडू
सीमाची ४ वर्षीय मुलगी पलक जेव्हा खेळता खेळता घरात पोहचली तेव्हा तिने आईला तडपताना पाहिले. हे पाहून ती जोरात किंचाळली. पलकचा आवाज ऐकून लोकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. आतील दृश्य पाहून लोक हैराण झाले. घरापासून काहीच अंतरावर दुसरी मुलगी पायल खेळत होती. सीमाला जखमी अवस्थेत पाहून लोकांनी तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आले. तिथे उपचारावेळी महिलेचा मृत्यू झाला.
पत्नीच्या हत्येनंतर पती फरार
दरम्यान, या घटनेनंतर फरार असलेला आरोपी पती रवीचा शोध पोलीस घेत होती. परंतु त्यातच सोमवारी सकाळी तिचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. रवीचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या आत्महत्येसोबतच इतर सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहेत.