अमरावती - दारू पिण्याच्या वादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले, या भांडणात रागाच्या भरात पतीने लाठी काठीने पत्नीला जबर मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ११ तारखेला मध्यरात्री ही घटना घडली. बुधवारी सकाळी या प्रकाराचा उलगडा झाला. गुरुवारी पहाटे पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, जमुना मुरले असं मृत महिलेचे नाव असून आरोपी रतन मुरले हा तिचा पती आहे. धारणी तालुक्यापासून ३५ किमी अंतरावरील कटुंगा गावातील हे दाम्पत्य ११ मार्च रोजी दामजीपुरा मार्गावरील लागवणीने घेतलेल्या शेतात राहत होते. त्याठिकाणी त्यांचा मुलगा रूपेश पत्नीसह आला होता. रतन आणि जमुना यांनी सवयीने मद्यपान केले, परंतु जमुनाने आणखी मद्याची मागणी केल्याने रतनने वाद घातला. सामोपचारानंतर चौघांनी मिळून मांसाहाराचे सेवन केले. त्यानंतर रूपेश पत्नीसह गावात परतला.
बुधवारी सकाळी रूपेश शेतात गेला असता त्याने वडिलांकडे आई कुठे आहे अशी विचारपूस केली. त्यावेळी आई गावात गेल्याचं उत्तर वडिलांनी दिले. रूपेशने गावात शोध घेतला परंतु आईचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा शेतात जाऊन वडील रतन यांना विचारणा केली तेव्हा ती गावातच असल्याचं रतनने सांगितले. शोधाशोध करून दमल्याने रूपेश झोपी गेला. सायंकाळी त्याला आई जमुनाचे धड कुटंगा ते दामजीपुरा मार्गावरील रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती मिळाली. तिच्या अंगावर जखमा होत्या आणि शरीरातून रक्त निथळत होते. रतनने त्याला और दारू पियो एवढेच उत्तर दिले, वडिलांनी रात्री आईसोबत भांडण उकरून काढत हत्या केल्याचं रूपेशच्या एव्हाणा लक्षात आलं.
वरील प्रकाराची माहिती रूपेश सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडून पोलिसांना कळवली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणला. रूपेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असता गुरुवारी पहाटे आरोपी रतनला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.