आंध्र प्रदेशात एका महिलेच्या हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी पतीने पत्नीची हत्या केली. मृत महिलेचे नाव उषाराणी होते तर आरोपी पतीचं नाव वेमागिरी माणिक्यम असं आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशातील राजनगरम भागातील ही घटना आहे.
कोंथमुरुच्या उषाराणीचं १० वर्षापूर्वी गिड्डुगुटुरच्या वेमागिरी माणिक्यमसोबत लग्न झाले होते. वेमागिरीने आयुष्यभर पत्नीची साथ देण्याचं वचन दिले होते. इतकेच नाही तर वेमागिरी स्वत:चं घर सोडून पत्नी उषाराणीच्या घरी म्हणजे सासरी राहिला होता. या दोघांना ९ वर्षाचा मुलगा निहांत आणि ७ वर्षाची मुलगी निस्सी अशी २ मुले आहेत. वेमागिरी सासरी वेल्डरचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा मात्र या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात संशयाच्या भूताने डोकावले. मागील काही दिवसांपासून पती वेमागिरी त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. त्यातूनच तो सातत्याने पत्नी उषाराणीला त्रास देत होता.
पती वेमागिरीकडून होणारा त्रास वाढतच असल्याने पत्नीने ते सहन केले नाही. तिने राजनगरम पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पतीवर पत्नीला छळल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलीस तक्रारीनंतर पती वेमागिरीने घरातून पळ काढला. मात्र शनिवारी रात्री वेमागिरी माणिक्यम अचानक घरी परतला. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याबद्दल त्याने पत्नीला जाब विचारला. यातून पुन्हा दोघांचे जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली.
डोक्यात हाणला दगड
दरम्यान, रागाच्या भरात वेमागिरीने घराबाहेर पडलेला दगड उचलून पत्नीच्या डोक्यात टाकला. त्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. या हल्ल्यावेळी मुले तिथेच होती त्यांनी बाहेर धावत जात शेजारी राहणाऱ्या आजीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या उषाराणीला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी उषाराणीला मृत घोषित केले. या प्रकाराबाबत उषाराणीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या याचा तपास पोलीस करत आहेत.