तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट
By मनीषा म्हात्रे | Updated: January 9, 2025 06:55 IST2025-01-09T06:54:31+5:302025-01-09T06:55:52+5:30
नवी मुंबई पोलिसांचा महिनाभरापासून ट्रॅप, पण छापा टाकण्याआधीच मालक पसार

तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टोरेसच्या घोटाळ्याबाबत कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने आठवड्याभरापूर्वीच पोलिसांसह तपास यंत्रणांना ई-मेल पाठवून अलर्ट दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर नवी मुंबई पोलिसांना महिनाभरापूर्वीच गुन्ह्यांची चाहूल लागून तपासही सुरू केला होता. परंतु या आठवड्यात छापा टाकण्यापूर्वीच मुंबईतील गोंधळ समोर आल्याने आरोपी हातातून निसटले. याप्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कोट्यवधी रुपये वाचले असते.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर टोरेसच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सीए अभिषेक गुप्ता आणि सीईओ तौफिक रियाजचा फोटो शेअर करून यांनी कंपनीची लूट करत गुंतवणूकदरांची दिशाभूल करण्यात येत आहे. सध्या हे अकाउंट कोण हॅन्डल करत आहे, याबाबत सायबर पोलिस तपास करत आहेत.
टोरेसमधील घोटाळ्याची चाहूल लागताच गुप्ताने ३० डिसेंबरपासून पोलिसांसह विविध तपास यंत्रणांना ई-मेल पाठवून पत्रव्यवहार सुरू केला. काही आयुक्त कार्यालयांतही तो जाऊन आला होता. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शेवटच्या टप्प्यात टोरेसकडून जास्तीचा मोबदला देण्याचे आमिष दाखवत रोखीने पैसे स्वीकारणे सुरू झाले होते. तसेच ५ जानेवारीपर्यंत पैसे भरल्यास थेट साडेअकरा टक्के आठवड्याला परतावा देण्याचे आमिष दाखवल्याने पैसे भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रक्कम घेण्यात आली. त्यामुळे वेळीच तक्रारीची दखल घेतली असती, तर कोट्यवधी रुपये वाचले असते, अशी चर्चा आहे. अभिषेकने कुणाशी पत्रव्यवहार केला, तो कुणाला भेटला, याचाही पोलिस तपास करत आहेत.
धमक्यामुळे पोलिसांत धाव
अभिषेक गुप्ताला याप्रकरणानंतर धमक्या येण्यास सुरुवात झाल्याने बुधवारी रात्री त्याने भायखळा पोलिस ठाणे गाठून तक्रार घेण्यास सांगितली. मात्र त्याची हद्द वेगळ्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितल्याचे भायखळा पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मुंबईतील एका पोलिस ठाण्यात त्याच्या तक्रारीवरून एनसी नोंदविण्यात आल्याचे समजते आहे.
दुसरीकडे नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला महिनाभरापूर्वी खबऱ्याकडून या घोटाळ्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने काम सुरू केले. स्वतः गुंतवणूक केली. त्यानुसार परतावाही आला.
हाती ठोस पुरावे लागल्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून घोटाळा उघडकीस आल्याच्या एक ते दोन दिवस आधी छापा टाकून कारवाई करण्याचे ठरले होते. मात्र त्यापूर्वीच मुंबईच्या घोटाळ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. महिनाभरापूर्वी माहिती मिळाल्याच्या वृत्ताला नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दुजोरा दिला.