बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीच्या हत्येचं CCTV फुटेज आता समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही आरोपी धारदार शस्त्रांनी आसिफवर हल्ला करताना दिसत आहेत. याच दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेली लोकं हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. आसिफची पत्नी देखील हस्तक्षेप करताना दिसत आहे.
दिल्लीतील निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंगच्या वादातून गुरुवारी रात्री अभिनेत्रीच्या भावाची हत्या झाली. गेटवरून स्कूटी काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. या वादात आरोपींनी आसिफ कुरेशीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आसिफला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
गौतम आणि उज्ज्वल अशी आरोपींची नावं आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत. उज्ज्वलने प्रथम आसिफ कुरेशीवर हल्ला केला. गौतम १८ वर्षांचा आहे तर उज्ज्वल १९ वर्षांचा आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफला जाणूनबुजून मारण्यात आलं आहे. नातेवाईक जावेदने सांगितलं की, यापूर्वीही दोनदा आसिफवर हल्ला करण्यासाठी जाणूनबुजून भांडण करण्यात आलं होतं. यापूर्वीही त्याच्यावर हल्ला झाला होता.
या घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी सांगितलं की, स्कूटर पार्किंगवरून हा वाद सुरू झाला. सुरुवातीला उज्ज्वल, गौतम आणि कुरेशी यांच्यात पार्किंगवरून वाद झाला, ज्याचं रूपांतर शिवीगाळ करण्यात झालं. आसिफच्या पत्नीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, गौतमने हल्ला करायला सुरुवात केली. आसिफवर वारंवार हल्ला करण्यात आला. त्यानंतर गौतमनेही आसिफच्या छातीवर वार केले, ज्यामुळे आसिफचा मृत्यू झाला.