मनोज साने किती क्रूर अन् विकृत? केली जाणार मनोवैज्ञानिक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 08:12 AM2023-06-17T08:12:40+5:302023-06-17T08:13:30+5:30

आवाजाचे नमुने पोलिस तपासणार

How cruel and perverted is Manoj Sane? A psychological examination will be conducted | मनोज साने किती क्रूर अन् विकृत? केली जाणार मनोवैज्ञानिक तपासणी

मनोज साने किती क्रूर अन् विकृत? केली जाणार मनोवैज्ञानिक तपासणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हत्या कशी करायची आणि हत्येनंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची भाईंदर पूर्वच्या मनोज साने याने गुगल सर्च इंजिनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. हत्येचा हेतूही स्पष्ट झालेला नसल्यामुळे, तसेच क्रूरतेने केलेल्या हत्येमुळे त्याची मनाेवैज्ञानिक तपासणी करण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी नयानगर पोलिसांनी केली होती. त्यानंतर त्याला २२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले.

दहा वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्याबरोबर एकत्रित राहणाऱ्या मनोज  सानेने (५६)  तिची भाईंदर पूर्वेतील गीता आकाशदीप इमारतीमधील घरात ४ जूनला निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करीत होता. त्याने यातील काही तुकडे कुकरमध्येही शिजवले होते. मनोजने सरस्वतीचा खून नेमका कोणत्या कारणामुळे केला, तो हेतूही अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्याने खून करण्याबाबत गुगलवरही सर्च केले होते. या सर्वच बाबींची सखोल चौकशी करायची असल्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत आणखी सहा दिवसांची वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी अभियोक्ता किरण वेखंडे यांनी केली.

आधी आरोपी मनोजला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. ती शुक्रवारी संपल्यामुळे पोलिसांनी सहा दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी दिवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. दरम्यान, आरोपीचे वकील अतुल सरोज यांनी युक्तिवाद करताना आधीच पोलिस तपासासाठी आठ दिवसांची कोठडी दिल्याचे निदर्शनास आणले. खुनाचा हा गंभीर आणि क्रूर प्रकार असल्याचे पोलिसांनी आधीही म्हटले होते. तसेच आधीच्या आणि आताच्या कोठडीच्या मागणीची कारणे (रिमांड रिपोर्ट) सारखीच असल्याचेही ॲड. सरोज यांनी सांगितले. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.

आवाजाचे नमुने पोलिस तपासणार

मनोजचे इतरही काही महिलांबरोबर संबंध असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्याचे आणि सरस्वती तसेच इतर महिलांबरोबरचे मोबाइलमधील संभाषण पडताळण्यात येत आहे. त्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुनेही तपासले जाणार आहेत.

Web Title: How cruel and perverted is Manoj Sane? A psychological examination will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.