मीरारोड -
८ दिवसां पूर्वीच घरकामास ठेवलेल्या मोलकरणीने घरातील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याच्या भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागातील घटने प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रलोकीच्या बाळासाहेब ठाकरे पालिका मैदाना शेजारी व्हाईट लोटस इमारतीत राहणारे निशांत श्रीवास्तव व त्यांची पत्नी राशी हे मुलगा व मुलीसह राहतात. पती - पत्नी कामावर जात असल्याने ८ दिवसां पूर्वीच त्यांनी घरकाम करण्यासाठी परवीना नावाची मोलकरीण कामास ठेवली होती. परंतु परवीना कामावर न आल्याने तिच्याशी अनेकवेळा संपर्क करून देखील होत नव्हता. राशी ह्या त्यांचे दागिने लाकडी कपाटात ठेवण्यासाठी गेल्या असता आत ठेवलेला सोन्याचा हार , साखळी, अंगठी, चांदीचे इत्तर दागिने दिसून आले नाहीत . २१ जुलै रोजी निशांत यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मोलकरीण कामावर ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती, राहण्याचा इथला व मूळ गावचा पत्ता, ओळखपत्र आदी घेण्यासा पोलिसांत पडताळणी करून घेण्याचे आवाहन पोलीस सातत्याने करत असतात. परंतु निशांत यांना परवीना चे संपूर्ण नाव सुद्धा माहिती नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परवीना हीच शोध सुरु केला आहे.