पिंपरी : कासारवाडीतील शास्त्रीनगर येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.१३) दुपारी एकच्या सुमारास घडली. सर्फराज उर्फ रावण शेख (वय २१, रा. कासारवाडी), सोहेल शेख (वय २०, रा. कासारवाडी), शाहबाज शेख, सोहेल पटेल, इस्माईल पटेल, अरबाज शेख, इरु उर्फ इरया (सर्व रा. कासारवाडी), अमीर शेख (रा. फुलेनगर झोपडपटटी, भोसरी), शहबाज शहा (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विरु शरणप्पा शिरसाठ (वय २७, रा. साईनगर चाळ, महिला आयटीआयचे केंद्राच्या पाठीमागे, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आरोपी सर्फराज शेख व शहबाज शहा यांनी काही जणांचे टोळके जमा केले. त्यानंतर आरोपी इस्माईल पटेल व फिर्यादी विरु शिरसाठ यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अरबाज शेख याने शिरसाठ यांना फरशी मारल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत पूर्ववैैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:48 IST