हरियाणातील रोहतक येथे हिमानी नरवालची हत्या करण्यात आली आणि मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला. पोलिसांनी सचिनला हत्येप्रकरणी अटक केली आहे. सचिन आणि हिमानी यांची फेसबुकवरून मैत्री झाली. सचिन विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. याच दरम्यान आणखी एक माहिती समोर आली आहे.
सचिन हिमानीच्या घरी वारंवार येत असे. २७ फेब्रुवारी रोजी सचिन रात्री ९ वाजता हिमानीच्या घरी पोहोचला आणि रात्रभर तिच्या घरीच राहिला. २८ फेब्रुवारी रोजी दिवसा हिमानी आणि सचिनमध्ये भांडण झालं. त्यानंतर सचिनने हिमानीला तिच्याच दुपट्ट्याने बांधलं आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून तिची हत्या केली.
या हाणामारीत सचिनच्या हाताला दुखापत झाली. हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये पॅक केला. सचिनने हिमानीची अंगठी, सोन्याची चेक, मोबाईल, लॅम्प टॉप आणि इतर दागिने एका बॅगेत ठेवले आणि हिमानीची स्कूटी घेऊन त्याच्या गावी गेला. हिमानीच्या या सर्व वस्तू त्याच्या दुकानातूनच जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रात्री १० वाजता हिमानीच्या घरी परत आला आणि हिमानीच्या घराबाहेर स्कूटर पार्क केल्यानंतर त्याने रात्री १०-११ वाजता एक ऑटो भाड्याने घेतली. यानंतर, त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला, ऑटोमध्ये बसला, सांपला परिसरात फेकून दिला आणि बसमध्ये चढून पळून गेला.
सचिनचं मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. १ मार्च रोजी रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये एक मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅग उघडली तेव्हा तो मृतदेह हिमानीचा असल्याचं आढळून आलं. या प्रकरणाच्या तपासासाठी ८ पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत. सचिन दीड वर्षांपासून हिमानीच्या घरी येत होता. दोघांमध्ये भांडण झालं, पण भांडण कशावरून झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सचिनने पोलीस चौकशीदरम्यान दावा केला आहे की तो हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. हिमानीने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. ती त्याला जास्त पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती.