डोक्यात दगड टाकून तरुणाला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 21:54 IST2021-07-17T21:54:12+5:302021-07-17T21:54:21+5:30
साल्टेक शिवार : पत्नीची पोलिसात फिर्याद

डोक्यात दगड टाकून तरुणाला संपविले
धुळे : मोटारसायकलीने शेताकडे जात असताना रस्त्यात अडवून डाेक्यात दगड टाकून कोणीतरी तरुणाचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील सालटेक शिवारात घडली. हा प्रकार शनिवारी सकाळी उजेडात आला. निजामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील सालटेक गावात राहणारे भिवा लासू गायकवाड (३५) या तरुणाचे लग्न झाले असून त्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. तो शेतकऱ्यांना शेतातील मजूर पुरविण्याचे काम करतो. शुक्रवारी सायंकाळी उशिराने निजामपूर, सालटेक परिसरात पाऊस झाला. शेतात जावून येतो असे पत्नीला सांगून त्याने भावाची दुचाकी घेऊन निघून गेला. रात्रभर तो घरीच आलाच नाही. सकाळी सालटेक गाव शिवारातील खडीटेकडी लागून असलेल्या एका कच्चा रस्त्यावर भिवा लासू गायकवाड याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर कोणीतरी दगडाने वार केल्याचे चिन्ह दिसून आले. कोणीतरी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
घटनेची माहिती निजामपूर पोलीस ठाण्यात कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. ज्योतीबाई भिवा गायकवाड हिच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.