हरियाणातील पानिपत जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षांच्या मुलीने मासिक पाळीचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केली. अन्नू असं या मुलीचं नाव असून १४ जुलै रोजी तिची वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी ती १८ वर्षांची झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवला.
अन्नूचे वडील सुरेंद्र मजूर म्हणून काम करतात. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चार मुलं आहेत. अन्नू त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात मोठी होती. ती १२ वी उत्तीर्ण झाली होती आणि आयटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. घटनेच्या दिवशी ते त्यांच्या धाकट्या मुलीला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले होते.
दुपारी ४:३० वाजता ते घरी परतले तेव्हा अन्नूने त्यांच्यासाठी चहा बनवला आणि नंतर वरच्या खोलीत गेली. काही वेळाने वडील वर गेले तेव्हा त्यांना दिसलं की खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. त्यांना संशय आला आणि जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना अन्नू पंख्याला लटकलेली आढळली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली.
अन्नूला बऱ्याच काळापासून मासिक पाळीशी संबंधित शारीरिक समस्या होत्या आणि तिच्यावर उपचारही सुरू होते. परंतु नियमित उपचार करूनही त्यात काही सुधारणा झाली नाही. यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ लागली. या तणावामुळे तिने हे आत्महत्येचं पाऊल उचललं. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.