उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने तिच्या नवऱ्यासोबत मिळून वडिलांच्या घरातून तब्बल ९० लाख रुपये चोरले आहेत. मुलगी आणि जावयाने मिळून सुनियोजित पद्धतीने चोरी केली आणि जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे आणि जोडप्यासह तिघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून ५९ लाख ६० हजार रुपये जप्त केले आहेत.
हरिद्वारच्या गंगनहर कोतवाली भागात राहणारे कापड व्यावसायिक मोहम्मद सरवर यांनी नुकतच त्यांचं गोडाऊन विकलं होतं. ज्यातून त्यांना ९० लाखांची मोठी रक्कम मिळाली. त्यांनी ही रक्कम त्यांच्या जुन्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत पिशवीत ठेवली होती. १० एप्रिल रोजी रात्री ते दुकानातून घरी परतले तेव्हा एका शेजाऱ्याने त्यांच्या जुन्या घराचं कुलूप तुटलेलं असल्याचं सांगितलं.
मुलगी आणि जावयाने रचला चोरीचा कट
मोहम्मद सरवर खोलीत पोहोचले तेव्हा तिथे ठेवलेले ९० लाख रुपये आणि काही मौल्यवान दागिने गायब होते. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं आणि संशयही व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, १० एप्रिल रोजी दुपारी त्यांची मुलगी शीबा घरी आली आणि ती वारंवार तिचा नवरा अझीमशी फोनवर बोलत होती. याशिवाय ती काही काळ बाहेरही गेली. सरवर यांना संशय होता की, शीबाने घराच्या चाव्या चोरल्या होत्या आणि त्या अझीमला दिल्या होत्या आणि त्यांनीच चोरीचा कट रचला होता.
अझीमवर होतं खूप कर्ज
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं. शीबा आणि अझीम यांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली असता, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान असं उघड झालं की, अझीमवर खूप कर्ज होतं आणि त्याची आर्थिक परिस्थिती वाईट होती. बीएसएम चौकाजवळ त्याची एक जिम आहे, जी चालवताना त्याला आर्थिक अडचणी येत होत्या.
घराच्या चाव्या चोरल्या अन्...
अझीम दिलेल्या माहितीनुसार, शीबाने त्याला सांगितलं होतं की त्यांच्या घरात खूप मोठी रक्कम आहे. यानंतर दोघांनी मिळून चोरीचा प्लॅन केला. त्याने आधी जुन्या घराच्या चाव्या चोरल्या आणि नंतर संधी साधून बॅगेत ठेवलेले पैसे चोरले. अझीमने चोरीचे पैसे त्याच्या आय-२० कारमध्ये ठेवले होते, जी त्याने सती मोहल्ला येथील स्मशानभूमीजवळ पार्क केली होती. अझीमने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गाडीची झडती घेतली आणि लाखो रुपये जप्त केले.