Karnataka Bank Robbery Case: कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँकेवरील दरोड्यानंतर मंगळवेढा पोलिसांना महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावातील एका पडक्या घरात सोन्याचे दागिने व रोकड असलेली बॅग सापडली आहे. बँक दरोडा तपासाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे कित्येक कर्नाटक पोलिस अधिकारी मंगळवेढा येथे पोलिस ठाण्यात होते. यादरम्यान हुलजंती येथे गावात एका पडक्या घरावर एक संशयित बॅग आहे, याबाबत स्थानिक नागरिकांनी संशय आल्याने पोलिसांना फोनवरून माहिती दिली.
त्यावेळी डीवायएसपी डॉ. चसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व कर्नाटक पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात सोने व रोकड असल्याचे दिसून आले. पंचाच्या समक्ष पंचनामा करून ती बॅग कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. यामध्ये किती रक्कम व सोने आहे याचा तपशील मिळू शकला नाही; मात्र या दरोडातील बहुतांशी रक्कम सोने मिळाल्याची चर्चा सुरू होती.
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या दरोड्यात बुरखाधारी दरोडेखोरांनी कोट्यवधी रुपयांची रोकड व दागिने लुटले होते. यामध्ये २० किलो सोने व एक कोटी रुपयाची कॅश लंपास केली होती. त्यांनी पळून जाताना बनावट नंबर प्लेटची कार वापरली होती. पळून जाताना हुलजंती येथे दुचाकी अपघातानंतर स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी गाडी सोडून पळ काढला. त्यानंतर रात्रभर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी हुलजंती परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र दरोडेखोराचा मागमूस लागला नव्हता.
संयुक्त पथकाकडून तपास
कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त पथके आरोपींचा तपास करत आहेत. गुरुवारी दुपारी पोलिसांना खबर मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी हुलजंती येथील त्या पडक्या घरातील सोने व पैशाची बॅग जप्त करून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र दरोडेखोरांनी कोट्यवधींचा माल लुटून पळताना ही बॅग टाकून दिली की जाणीवपूर्वक गुप्त ठिकाणी ठेवली, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.