मध्य प्रदेशातील देवास शहरातील एका घरात एका महिलेचा कुजलेला मृतदेह फ्रिजमध्ये आढळला. पोलीस तपासादरम्यान, मृत महिलेची ओळख ३० वर्षीय प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापती अशी झाली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रतिभाने लग्नासाठी दबाव आणला तेव्हा तिचा जोडीदार संजय पाटीदारने ही हत्या केली. संजयने त्याचा मित्र विनोदसोबत मिळून प्रतिभाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह फ्रिजमध्ये लपवला. १० महिन्यांनंतर जेव्हा दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हे उघड झालं.
उज्जैनमधील मौलाना गावातील संजय पाटीदार जुलै २०२३ पासून त्याची लिव्ह-इन पार्टनर प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापतीसोबत धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या घरात राहत होता. जून २०२४ मध्ये, संजयने घर रिकामं केलं, परंतु घरातील दोन खोल्या रिकाम्या केल्या नाहीत. घरमालकाला सांगितलं की, मी काही सामान ठेवलं आहे आणि नंतर येऊन ते घेऊन जाईन. तो इंदूरमध्ये राहणाऱ्या घरमालकाला भाडं ऑनलाईन ट्रान्सफर करत होता.
पोलीस निरीक्षक अमित सोलंकी म्हणाले की, घराचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर फ्रिजने काम करणं बंद केलं आणि घराच्या त्या भागातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर शेजारीही अस्वस्थ झाले आणि घरमालकाला इंदूरहून बोलावण्यात आलं. फ्रीज उघडला असता त्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांना मृत महिलेचे वय सुमारे ३० वर्ष असल्याचं आढळलं. ही हत्या जून २०२४ मध्ये झाली असावी असा पोलिसांना संशय होता.
संजय पाटीदार आणि पिंकी वृंदावन धाम कॉलनीत पती-पत्नीसारखे राहत होते. जानेवारी २०२४ मध्येच दोघांनीही कॉलनीतील मंदिरात भंडारा आयोजित केला होता. याच दरम्यान, मार्चमध्ये प्रतिभा दिसली नाही तेव्हा शेजाऱ्यांनी संजयकडे विचारपूस केली. यावर संजयने सांगितलं की, पिंकीच्या आईला हार्ट अटॅक आला होता, म्हणून ती तिच्या माहेरी गेली आहे. आता आपण हे घर रिकामं करून निघत आहोत.
एसपी पुनीत गेहलोत म्हणाले की, प्रतिभा उर्फ पिंकी गेल्या पाच वर्षांपासून संजय पाटीदार यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. तर पाटीदार आधीच विवाहित होता. त्यांची पत्नी आणि मुलगी उज्जैनमध्ये राहतात. माझ्या मुलीचे लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. तर, प्रतिभाला तीन वर्षे उज्जैनमध्ये ठेवल्यानंतर, संजयने दोन वर्षांपूर्वी तिला देवासला आणलं. जानेवारी २०२४ पासून प्रतिभाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, यामुळेच त्याने प्रतिभाची हत्या केली.