MP Crime: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदौरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राज्य सरकारच्या वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी वंदना वैद्य यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या आवलीपुरा गावात हे फार्महाऊस आहे. मंगळवार दरम्यानच्या रात्री, पोलिसांना येथे मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने पथक तयार करून फार्महाऊसवर छापा टाकला. फार्महाऊसचे मुख्य गेट बाहेरून कुलूपबंद होते, मात्र आतमध्ये जुगाराचा मोठा डाव मांडला गेला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून १३.६८ लाख रुपयांची रोख रक्कम, ३० महागडे मोबाईल फोन आणि पत्त्यांचे कॅट जप्त केले आहेत.
मुख्य आरोपी आणि केअरटेकर पसार
पोलिसांनी १८ जुगारींना रंगेहात पकडले असले तरी, ६ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. यामध्ये जुगाराचे आयोजन करणारा मुख्य सूत्रधार जगदीश राठोड उर्फ कुबडा आणि फार्महाऊसचा केअरटेकर रणजीत चौधरी यांचा समावेश आहे. अटकेत असलेले आरोपी राज्याच्या विविध भागांतून जुगार खेळण्यासाठी येथे आले होते.
IAS अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
हा छापा पडल्यानंतर आयएएस अधिकारी वंदना वैद्य यांनी पोलिसांना पत्र लिहून एक वेगळाच दावा केला आहे. "काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या कौटुंबिक फार्महाऊसवर बेकायदेशीरपणे प्रवेश केला असून तिथे चोरी झाल्याचा संशय आहे," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या घुसखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तीन पोलीस कर्मचारी निलंबित
या गंभीर प्रकरणाची दखल घेत ग्रामीण पोलीस अधीक्षक यांगचेन डोलकर भुतिया यांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी मानपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी, उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक या तिघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर हे लोक नेमके कसे पोहोचले आणि यात कुणाचे अभय होते, याचा सखोल तपास केला जाईल," असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
Web Summary : An IAS officer's farmhouse in Indore was raided, revealing a gambling operation. Eighteen people were arrested, and ₹13.68 lakh was seized. The officer claims illegal entry and theft, while three police officers were suspended for negligence.
Web Summary : इंदौर में एक आईएएस अधिकारी के फार्महाउस पर जुआ अड्डे का भंडाफोड़ हुआ। अठारह लोगों को गिरफ्तार किया गया, और ₹13.68 लाख जब्त किए गए। अधिकारी ने अवैध प्रवेश और चोरी का दावा किया, जबकि तीन पुलिस अधिकारियों को निलंबित कर दिया गया।