जुगाराचं व्यसन एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे, एका तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर कबूल केलं की, जुगारामुळे तो त्याच्या वडिलांशी खोटं बोलला, त्याच्या मित्रांच्या नावाने पैसे मागितले आणि आता शेवटी ३३ लाखांचं कर्ज झालं आहे. तरुणाच्या या खोटेपणामुळे त्याने त्याच्या आयु्ष्यासोबतच कुटुंबीयांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त केलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
तरुण कॉम्पूटर सायन्सचा विद्यार्थी होता. बारावीत ५५% गुण मिळवल्यानंतर त्याचा त्रास सुरू झाला. त्याला प्लेसमेंटसाठी अपात्र ठरवण्यात आले, परंतु सत्य सांगण्याऐवजी तो त्याच्या कुटुंबाशी खोटे बोलला आणि दावा केला की त्याला १६ ते २५ लाख पगाराची नोकरी मिळाली आहे. त्याच्या कुटुंबाला त्याच्या यशाचा अभिमान होता. यानंतर तो भाडं, कोचिंग आणि करिअरच्या नावाखाली पैशांची मागणी करू लागला, परंतु प्रत्येक वेळी मिळालेले पैसे तो जुगारात गमावत होता.
रेडिट पोस्टमध्ये तरुणाने त्याची सर्व गुपितं उघड केली. त्याने त्याच्या वडिलांना ११ खोटी नावं दिली आणि असा दावा केला की, ते त्याचे मित्र आहेत ज्यांना ट्यूशनसाठी कर्जाची आवश्यकता होती. तरुणाचे वडील पैसे उधार देण्याचं काम करत होते. त्यामुळे ते सहमत झाले आणि मुलाला लाखो रुपये दिले. प्रत्यक्षात मुलगा ते सर्व पैसे जुगारातही हरला. "माझ्या मित्रांना याबाबत काहीच माहिती नाही. मी सर्व पैसे हरलो आहे आणि आता ३३ लाखांचं कर्ज झालं" असं तरुणाने सांगितलं.
तरुणाने स्पष्ट केलं की, त्याच्या वडिलांना वाटायचं की, तो महिन्याला १ लाख रुपये कमवतो आणि घरी पैसे पाठवतो. प्रत्यक्षात तो बेरोजगार आहे आणि जुगाराचं व्यसन होतं. त्याच्या वडिलांचं मासिक उत्पन्न फक्त ५०,००० रुपये आहे आणि ते त्यांच्या मुलाच्या कमाईवर आनंदी आहेत. तरुणाला भीती आहे की, जर सत्य बाहेर आलं तर वडिलांना मोठा धक्का बसेल. या घटनेची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.