आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी
By रवींद्र देशमुख | Updated: May 26, 2023 18:22 IST2023-05-26T18:21:54+5:302023-05-26T18:22:08+5:30
नऊ जणांवर गुन्हा दाखल

आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी
रवींद्र देशमुख, सोलापूर: आंब्याच्या कॅरेटची मागणी करत अरबाज अल्ताफ बागवान ( वय २४, रा. न्यू बापूजी नगर, शास्त्री नगर) यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालत रॉडने मारहाण केली. शिवाय तलवारीने ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बागवान यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भारत नगर येथे घडली.
बागवान हे आंब्याची गाडी रिकामी करून आंब्याची छाटणी करताना आरोपी रोहित परदेशी हा तेथे येऊन फिर्यादीला पैशाची मागणी करू लागला. यावेळी फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी परदेशी हा थोड्या वेळाने चेतन परदेशी, अभिषेक परदेशी, गण्या लंबू, आरिफ शेख व त्याच्या अन्य चार साथीदारांसह आला. तेथे येऊन बागवान यांना लोखंडी सळईने मारून आंबे रस्त्यावर फेकले. शिवाय अन्य आरोपीने त्यांना दगडाने, सळईने मारून त्यांना जखमी केले. शिवाय गोडाऊन मधील लाईटचे नासधूस केले. तलवार घेऊन ये आपण याच्या बापाला खल्लास करू अशी धमकी दिली, असे बागवान यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.