लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या : ओढणीने गळा आवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:31 PM2020-03-16T20:31:27+5:302020-03-16T20:33:09+5:30

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची तिच्याच ओढणीने गळा आवळून प्रियकराने हत्या केली आणि पळून गेला. सोमवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर सदर पोलिसांनी धावपळ करून आरोपी प्रियकराला अटक केली.

Fiancee's murder due to forcing wedding: Throat strangulation by scarf | लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या : ओढणीने गळा आवळला

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या : ओढणीने गळा आवळला

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील मंगळवारी कॉम्प्लेक्स परिसरातील घटना : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची तिच्याच ओढणीने गळा आवळून प्रियकराने हत्या केली आणि पळून गेला. सोमवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर सदर पोलिसांनी धावपळ करून आरोपी प्रियकराला अटक केली. आसिफ कासीम शेख (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील पिटेसूरचा रहिवासी आहे. हुस्ना जाबीन शेख (वय २१) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पाचपावलीच्या महेंद्रनगरातील रहिवासी होती.
सीताबर्डीतील एका मोबाईल शॉपीत हुस्ना काम करायची. आरोपी आसिफ वाहनावर क्लीनर म्हणून काम करतो. तीन वर्षांपूर्वी हुस्ना आणि आसिफचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ते कामाला बुट्टी मारून एकमेकांसोबतच राहू लागले. वर्षभरापूर्वी त्यांच्यात वितुष्ट आले. दोघांच्याही डोक्यात संशयाचा किडा शिरल्याने तो तिच्यावर आणि ती त्याच्यावर संशय घेऊ लागली. गेल्या दोन महिन्यांपासून हुस्ना लग्नासाठी खूपच आक्रमक झाली होती. ती कासीमला लवकर लग्न करावे म्हणून धारेवर धरत होती. तिने लावलेल्या तगाद्यामुळे कासीम तिला टाळायचा. परिणामी त्यांच्यात पुन्हा वाद होऊ लागले. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री ७.३० वाजता हे दोघे सदरमधील मंगळवारी कॉम्प्लेक्स चौकात भेटले. हुस्नाने त्याला चौकातच लग्नाचा विषय काढून फटकारणे सुरू केले. त्यांच्यातील हे भांडण तब्बल साडेचार तास सुरू होते. तेथे गर्दी जमल्यामुळे ते कडबी चौकात गेले. तेथून परत भांडण करीतच ते मंगळवारी कॉम्प्लेक्सजवळ आले. तेथे रात्री १ वाजेपर्यंत ते भांडतच होते.
लग्न केल्याशिवाय तुला सोडणार नाही, असा हट्ट तिने मांडला होता. आसिफ नकार देत असल्याने तिने त्याच्या पुुरुषार्थावर संशय घेऊन त्याला नको त्या भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या आसिफने तिला मारहाण करीत खाली पाडले. तिच्या गळ्यातील ओढणी दोन्हीकडून घट्ट ओढत तिचा गळा आवळला आणि पळून गेला.

ओळखपत्रावरून काम सोपी झाले
सोमवारी सकाळी परिसरातील मंडळी तेथून जात असताना त्यांना तरुणीचा मृतदेह पडून दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एकाने पोलिसांना कळविले. त्यानुसार, सदरचे ठाणेदार महेश बनसोडे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनीही भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला. तरुणीजवळ ओळखपत्र आढळले. त्यावरून पोलिसांचे काम सोपी झाले. तिचे नाव आणि पत्ता कळल्याने पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तो मृतदेह हुस्नाचा असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मोबाईलवरून ती आसिफच्या संपर्कात होती, तेदेखील पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली. तो रात्रीपासून घरीच आला नसल्याचे कुुटुंबीयांनी सांगितल्यामुळे त्याच्यावरील संशय घट्ट झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडे विचारणा केली. अखेर दुपारी ४ च्या सुमारास गिट्टीखदान परिसरात आरोपी आसिफ पोलिसांच्या हाती लागला. त्याने हुस्नाच्या हत्येची कबुली देतानाच तिने लग्नासाठी तगादा लावला होता. ती नको त्या भाषेत बोलून मानसिक त्रास देत होती, त्यामुळे हत्या केल्याचे सांगितले.

‘छपाक’ची चर्चा, पोलिसांचा इन्कार!
हुस्नाचा मृतदेह घाणीत बरेच तास पडून होता. त्यामुळे तिच्या चेहºयावर चिखल घट्ट चिपकला होता. ते पाहून तिच्या चेहºयावर आरोपीने अ‍ॅसिड टाकले असावे, असा संशय निर्माण झाला होता. तशी चर्चाही पसरली होती. मात्र, पोलिसांनी अ‍ॅसिडचा स्पष्ट इन्कार केला.
विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी नेहमीच्या कटकटीनंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. मात्र, काही दिवस दूर राहिल्यानंतर ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’अशी स्थिती झाल्याने ते पुन्हा एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले. परंतु त्यांच्यातील कटकट सुरूच होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की हुस्ना कायमची संपली अन् तिचा प्रियकर आसिफ आता हत्येचा आरोपी म्हणून कोठडीत पोहचला.

 

Web Title: Fiancee's murder due to forcing wedding: Throat strangulation by scarf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.