पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा
By दत्ता यादव | Updated: February 18, 2025 23:37 IST2025-02-18T23:36:27+5:302025-02-18T23:37:50+5:30
संबंधित डाॅक्टर महिलेस ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल केला होता

पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क, कोरेगाव: किन्हई, ता. कोरेगाव येथील एका ६५ वर्षीय महिला डाॅक्टरला तुमच्या विरोधात मुंबईमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या अटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, आम्ही तुमच्या वयाच्या विचार करून ‘डिजिटल अरेस्ट’ करत आहोत, असे म्हणून अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल करून सुमारे ७० लाख ९२ हजार ९९३ रुपयांना गंडा घातला.
संबंधित डाॅक्टर महिलेस ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल केला. मी पोलिस इन्स्पेक्टर हेम्पत्ती कलश, टिळकनगर पोलिस ठाण्यातून बोलत आहे, असे सांगितले. तुमचा एक मोबाइल नंबर मुंबई येथे ॲक्टिव्ह असून, त्यावरून लोकांना अश्लील मेसेज जात आहेत. तुमच्या विरोधात १८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. हा मोबाइल क्रमांक व तुमचे आधार कार्ड क्रमांक अजून कुठे लिंक आहे, हे तपासतो आणि पुन्हा एक तासाने कॉल करतो, असे सांगितले.
त्याच दिवशी परत एक तासाने संबंधित व्यक्तीने फोन करून सांगितले की, मनी लाँड्रिंग केसमध्ये तुमचे आधार कार्ड वापरले गेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आम्ही तुमच्या वयाचा विचार करून ऑनलाइन डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे सांगून भीती दाखवली. त्याबद्दल ठरावीक बँक खात्यावर रक्कम पाठवण्यास सांगितले. अज्ञात व्यक्तीने मोबाइल कॉलवरून सांगितल्यानुसार संबंधित महिलेने दि. ६, १० आणि १३ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या बँक खात्यांवर ‘आरटीजीएस’द्वारे एकूण ७० लाख ९२ हजार ९९३ रुपये पाठवले.
संबंधित महिलेने याप्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे अधिक तपास करीत आहेत.