पिंपरी : एकच फ्लॅट अनेक जणांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील उपमहापौराला पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी करताना शनिवारी (दि. ३०) तो खोकत व शिंकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला चौकशीकामी पोलीस ठाण्यात पुन्हा हजर होण्याची नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले. राजेश दिलीप काळे (वय ४०, रा. सोलापूर) असे उपमहापौराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याने पिंपळे निलख येथील एक फ्लॅट अनेक जणांना विक्री केला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गेल्यावर्षी आरोपी काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच काळे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काळे याला शुक्रवारी सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यासाठी सांगवी पोलिसांचे एक पथक सोलापूरला गेले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला सांगवी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी शनिवारी त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी काळे याला शिंका येऊन तो खोकत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला समज दिली, तसेच चौकशीकामी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
कोरोनाच्या भीतीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी दिले सोडून ; फसवणूक प्रकरणी घेतले होते ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 21:57 IST
उपमहापौर चौकशी करताना खोकत व शिंकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कोरोनाच्या भीतीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी दिले सोडून ; फसवणूक प्रकरणी घेतले होते ताब्यात
ठळक मुद्देएकच फ्लॅट अनेक जणांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी उपमहापौराविरोधात गुन्हा दाखल