दिल्लीच्या फतेहपूर बेरी परिसरात पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ सप्टेंबर रोजी चंदन होला गावात ही घटना घडली. दिल्लीपोलिसांची टीम एका आरोपीला अटक करण्यासाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आझम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम आली होती.
आझमविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. पोलिसांना पाहताच आझमने त्याच्या नातेवाईकांसह पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दिल्ली पोलिसांनी जखमी पोलिसांचे जबाब नोंदवले आहेत आणि या जबाबांच्या आधारे आझम आणि इतर हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि पोलिसांच्या टीमवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी पोलीस सध्या गाव आणि आसपासच्या भागात छापे टाकत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्याच सुरक्षेवर आणि गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक रहिवासीही घाबरले आहेत आणि आता पोलीस संरक्षणाची मागणी करत आहेत. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.