Famous salon owners duped crores of rupees; Police arrested 5 people | प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

ठळक मुद्देप्रसिद्ध सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या एका परदेशी कंपनीला त्यांचा व्यवसाय मुंबईत वाढवायचा होता. या प्रकरणी आरएके पोलीस अधिक तपास करत आहेत. एका खासगी कंपनीला वितरक म्हणून नेमले होते.

मुंबई - २१ नामांकित सलून आणि ब्यूटी पार्लरची परदेशी सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरएके पोलिसांनी रोनीत शहा (२५), निलेश दुबे (२८), लालजी गुप्ता (४५), अन्वर खान (२४) आणि शितल वऱ्हाडे (३१) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरएके पोलीस अधिक तपास करत आहेत. 

प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या एका परदेशी कंपनीला त्यांचा व्यवसाय मुंबईत वाढवायचा होता. त्यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीला वितरक म्हणून नेमले होते. त्यांनी नेमलेला सेल्समन रोनीत ऊर्फ जयप्रकाश शहा याने त्याचे ग्राहक असलेल्या सलून व ब्यूटी पार्लरला या कंपनीचा माल मोठ्या प्रमाणात विकला. यावेळी त्याने परदेशात पाठविण्यासारखी विविध प्रलोभने या सलून कर्मचारी व मालकांना दाखवली. त्याचप्रमाणे कोणताही माल उरल्यास तो परत आम्हीच खरेदी करू असे गाजर दाखविले.  

त्यानंतर या सलून मालकांनी परत केलेला माल शहा घेऊन गेला. मात्र, त्याने सलून मालकांना पैसे परत केले नाही. या सलून मालकांनी परत केलेला माल विकून शहाने पैसे कमावले. हा सर्व व्यवहार आणखी दोन सेल्समनला कळाल्यानंतर त्यांनीही अशा प्रकारे फसवणूक करण्यात सुरूवात केली. त्यानंतर वितरक कंपनीकडे मुंबईतील २१ नामांकित सलून मालक व कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. ३ सप्टेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ या कालावधीत आरोपींनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी रोनीत शहा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यानंतर इतर दोन सेल्समननेही फसवणूक केली. याप्रकरणी आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ४२०, ४१९, ४०८, ४११ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाखांचा माल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

 


Web Title: Famous salon owners duped crores of rupees; Police arrested 5 people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.