expose of dawood property in Britain | दाऊदच्या ब्रिटनमधील मालमत्तेचा उलगडा
दाऊदच्या ब्रिटनमधील मालमत्तेचा उलगडा

मुंबई : गेल्या अडीच दशकांपासून फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या देशभरात विविध ठिकाणी व ब्रिटनमध्ये असलेल्या बेनामी मालमत्तांबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) हाती महत्त्वपूर्ण महिती लागली आहे. दिवगंत गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या अटक केलेल्या दोघा दलालांकडील चौकशीतून हा उलगडा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


मिर्चीच्या मुंबईतील कोट्यवधीच्या मालमत्तेच्या विक्री व्यवहाराप्रकरणी ईडीने दिल्लीतून रणजित सिंग बिंद्रा व हारुन अलीम युसूफ यांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन मालमत्तेच्या जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाºया इक्बाल मिर्चीचे तो फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले होते. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली. या व्यवहारात सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुन युसूफ याने दलाली केली होती. ईडीने मनी लॉन्ंिड्रग प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात दोघेजण चौकशीसाठी हजर होत नव्हते. त्यांना दिल्लीतून अटक केल्यानंतर चौकशी केली असता दाऊदच्या देशातील व ब्रिटनमधील मालमत्तेची माहिती मिळाली, त्याबाबत आतापर्यंत सरकारकडे काहीही माहिती नव्हती. त्यामुळे दोघांकडून मिळालेल्या माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.


Web Title: expose of dawood property in Britain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.