संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, ६५ लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Updated: January 23, 2025 23:06 IST2025-01-23T23:06:12+5:302025-01-23T23:06:52+5:30

नरेश गोयल मनी लॉंड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा केला आरोप

Entire family under 'digital arrest', Rs 65 lakhs embezzled in nagpur | संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, ६५ लाखांचा गंडा

संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, ६५ लाखांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कुटुंबाला तुमचे सीम कार्ड मनी लॉंड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भिती दाखविण्यात आली होती. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत घटना घडली आहे. ८ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर ७०७७४०४१२५ या क्रमांकावरून फोन आला व समोरील व्यक्तीने तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर खरेदी केलेल्या सीमकार्डचा उपयोग करून उघडलेल्या बॅंकखात्यातून मनी लॉंड्रिंग सुरू असल्याने सीबीआयकडून पडताळणी करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी एका व्यक्तीचा सीबीआय अधिकारी म्हणून व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल आला व त्याने त्याला विविध तपशील विचारले. तुमचा संबंध नरेश गोयल मनी लॉंड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात येत आहे असे सांगितले.

आरोपीने त्यानंतर मुलाकडून कुटुंबीय तसेच आर्थिक स्थितीबाबत जाणून घेतले. पालकांना मुलाच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली. त्याने हा प्रकार सांगितल्यावर तेदेखील घाबरले. आरोपीने त्यांनादेखील डिजिटल अरेस्टमध्ये राहण्यास सांगितले. त्यांचा व्हिडीओ कॉल सातत्याने सुरू होता. समोरील आरोपीने त्यांच्याकडून बॅंक खात्याचे तपशील घेतले. या प्रकरणातून बाहेर निघायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले.

१० जानेवारी रोजी अधिकाऱ्याने नागपुरातून ४९ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले तर त्यानंतर १३ जानेवारी रोजी विदर्भातील एका मोठ्या शहरात जाऊन तेथून २६ लाख रुपये वळते केले. बाहेर असतानादेखील त्याचा व्हिडीओ कॉल सुरू होता. संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असताना एक नातेवाईक त्यांना भेटले. त्यांनी का घाबरलेले दिसता असे विचारले असता अधिकाऱ्याने आपबिती सांगितली. तुमची फसवणूक झाली आहे असे नातेवाईकाने सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Entire family under 'digital arrest', Rs 65 lakhs embezzled in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.