आरोपीने डार्कनेटवरून मागवल्या गांजाच्या बिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:22 IST2019-12-18T00:22:26+5:302019-12-18T00:22:45+5:30
साथीदार अटकेत : घरातच गांजाची शेती प्रकरण

आरोपीने डार्कनेटवरून मागवल्या गांजाच्या बिया
मुंबई : माहुलमध्ये घरातील कुंड्यांमध्ये अत्याधुनिक पद्धतीने गांजाचे उत्पादन करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष-३ ने पर्दाफाश केल्यानंतर, या गांजाच्या शेतीसाठी लागणाºया बिया डार्कनेटवरून मागविल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानुसार, या प्रकरणात आणखीन एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी यापूर्वी इंजिनीअर निखील शर्मा (२६) याला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १ किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी जप्त केला होता. यातील पसार आरोपींचा शोध सुरू असताना, शर्माचा साथीदार फेनिक्स राजैया (२६) याला चेंबूरमधून सोमवारी अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी अंमली पदार्थ व गांजाच्या बिया परदेशातून बेकायदेशीर मार्गाने मागविण्याकरिता डार्कनेट या इंटरनेट माध्यमाचा वापर केल्याचे समोर आले. येथील एम्पायर मार्केट या साइटवरून त्यांनी एमडी मागविले, तर कन या साइटवरून गांजाच्या बिया मागवून बीट कॉइनद्वारे पैसे पाठविले. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.
चार लाखांचे एमडी हस्तगत
अमली पदार्थविरोधी पथकाने अनायो सॅन्डे (२७) या नायजेरियन तरुणाला सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून २१० ग्रॅम एमडी सापडले असून या साठ्याची किंमत चार लाखांहून अधिक आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.