मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नातवाने सर्वप्रथम आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या घटनेने दुखावलेल्या त्याच्या आजोबांनी थेट जळत्या चितेत उडी मारून आत्महत्या केली.
सिधी जिल्ह्यातील बहरी पोलीस स्टेशन परिसरातील सिहोलिया गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३४ वर्षीय अभयराज यादवने त्याची ३० वर्षीय पत्नी सविता यादवची हत्या केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी संध्याकाळी अभयराज आणि त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभयराजचे आजोबा राम अवतार यादव या घटनेमुळे मानसिकदृष्ट्या खचले होते. शनिवारी सकाळी त्यांनी त्यांच्या नातवाच्या जळत्या चितेत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं.
बहरी पोलीस स्टेशन परिसरातील डीएसपी गायत्री तिवारी म्हणाल्या, राम अवतार यादव त्यांच्या नातवाच्या मृत्यूमुळे धक्क्यात होते. शनिवारी सकाळी त्यांचा जळालेला मृतदेह चितेवर आढळला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि अभयराजने आपल्या पत्नीची हत्या का केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.