कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकातून ६१ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून, त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील दयाराम गजघाटे (६१, रा.नागपूर) यांना आरोपी आदिती ढोके हिने कर्जत रेल्वे स्टेशन येथे बोलावले. त्यानंतर, तिने साथीदार सुशील जाधव, गणेश प्रधान यांच्या मदतीने फिर्यादीचे अपहरण करून सायंकाळी सुमारे ७ च्या सुमारास फिर्यादीला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. त्यानंतर, आरोपी ढोके राहत असलेल्या फ्लॅटमध्ये फिर्यादीला डांबून ठेवले. मारहाण करत चॉपरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत लुटले.
ही घटना ८ आणि ९ मार्च दरम्यान घडली. कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आणि कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद तपास करीत आहे.
खात्यातूनही पैसे काढले
आरोपींनी दीड तोळ्याची सोन्याची दोन, दोन सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रोख व दोन मोबाइल फोन असा एकूण २ लाख १५ हजारांचा ऐवज लुटला.तसेच एटीएम कार्डचा पिन नंबर जबरदस्तीने घेऊन त्यांच्या बँक खात्यातूनही पैसे काढले. क्रेडिट कार्डद्वारे खरेदीही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.