पटना - बिहारची राजधानी पटना इथं संजीव हंस यांच्याशी निगडीत मुख्य अभियंत्यांच्या घरी सकाळी ईडीने धाड टाकली. सरकारी कंत्राट मॅनेज करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रूपये जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या नोटांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मागील ८ तासांपासून ही मोजणी सुरूच आहे. रोकड पाहून अधिकाऱ्यांना नोटा मोजणाऱ्या ४ मशीन मागवाव्या लागल्या परंतु अद्यापही नोटांचा ढीग संपला नाही.
पटनातील बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या घरी ईडीने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य अभियंत्याचे घर पूर्णेंद नगर परिसरात आहे. हे प्रकरण आयएएस संजीव हंस यांच्याशी निगडीत आहे. आज सकाळी मुख्य अभियंत्याच्या घरी ईडी अधिकारी पोहचले त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घराचे मुख्य दरवाजे बंद करून शोध मोहीम घेतली. अभियंत्याच्या नातेवाईकांच्या घरीही रेड टाकण्यात आली आहे.
मागील ८ तासांपासून नोटा मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु रोकड इतकी आहे की त्याचा अंतिम आकडा समोर यायला आणखी काही तास लागू शकतात. ही रोकड कुठून आली, कुणाला दिली जात होती याचा शोध घेतला जात आहे. पहाटे ४-५ च्या दरम्यान ईडीचे पथक तारिणी दास यांच्या घरी धडकले, दास यांच्या नातेवाईकांच्या घरीही याचवेळी धाड टाकली. ईडी अधिकाऱ्यांनी तारिणी दास यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर घरात रोकड सापडली आहे.
काय आहे प्रकरण?
आयएएस अधिकारी असलेल्या संजीव हंस यांनी बिहार प्रशासनात विविध पदांवर कार्यरत असताना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कमावले. गुलाब यादव आणि इतर सहकाऱ्यांनी यात संजीव हंस यांची मदत केली. भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेला काळा पैसा पांढरा करून देण्यात या लोकांनी आयएएस संजीव हंस यांची मदत केली. याच प्रकरणात ईडीने कारवाई सुरू केली. ३ डिसेंबरला ईडीने १३ ठिकाणी धाड टाकली होती. संजीव हंस यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे डिमॅट खाती उघडण्यात आली. या खात्यातून ६० कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली होती.