Bihar Crime: बिहारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. होमगार्डच्या भरतीसाठी आलेल्या तरुणीवर दोघांनी रुग्णवाहिकेतच बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीला रुग्णालयात नेत असताना ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्याने तिच्यावर अत्याचार रुग्णवाहिकेत अत्याचार केला. पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर, दोघांनीही तिला गप्प राहण्याची धमकी दिली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बिहारमधील गयाजी येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवारावर बलात्कार करण्यात आला. ही घटना २४ जुलै रोजी घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. बोधगया येथील बीएमपी-३ च्या क्रीडा मैदानात महिला होमगार्ड्सची मैदानी चाचणी सुरु होती. त्यावेळी उमेदवारांना धावण्यास सांगितले होते. पीडित तरुणी धावता धावता अचानक जमिनीवर पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी तरुणीलातिथे तैनात करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतून मगध मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. मात्र आरोपींनी वाटेतच तरुणीवर अत्याचार केला आणि तिला रुग्णालयात दाखल केले.
रुग्णवाहिकेसोबत एकही महिला कर्मचारी पाठवण्यात आली नाही. वाटेत चालक आणि कर्मचाऱ्यांचा हेतू बदलला. आधी कर्मचाऱ्याने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर चालकाने एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि तिला वासनेचे शिकार बनवले. त्यानंतर तरुणीला धमकावण्यात आले आणि मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेने तरुणीने डॉक्टरांना संपूर्ण प्रकार सांगितल. त्यानंतर पोलिस आले आणि त्यांनी तरुणीचे म्हणणं ऐकून घेत पुढील कारवाई सुरु केली.
मैदानी चाचणी दरम्यान मी बेशुद्ध पडले. मला काही वेळ तिथे बसवण्यात आले. त्यानंतर तिथे असलेल्या रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. रुग्णवाहिकेच्या चालक आणि तंत्रज्ञाने मला आत बसवले, असं पीडितेने सांगितले. रुग्णवाहिका भरतीच्या मैदानापासून दोभी-पाटणा मुख्य रस्त्यावर पोहोचली. त्यानंतर रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली आणि तिच्या गळ्यातील आयडी काढला. त्यांनी बीएमपी-३ च्या गेटवर उभ्या असलेल्या लोकांना विचारले की या तिच्या कोणी ओळखीचे आहे का. पण जेव्हा कोणी ओळखीचे सापडले नाही तेव्हा रुग्णवाहिका रुग्णालयाकडे निघाली.
वाटेत कर्मचाऱ्याने बेशुद्ध मुलीवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेने सांगितले की तंत्रज्ञाने तिच्या चेहऱ्यावर काहीतरी पाण्यासारखे मारले ज्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. त्यानंतर कर्मचाऱ्याने चालत्या रुग्णवाहिकेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गाडी काही वेळ सिकारिया वळणावर थांबली, जिथे चालकाने पीडितेवर बलात्कारही केला.
संपूर्ण घटनेदरम्यान पीडिता बेशुद्ध होती. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर, दोन्ही आरोपी तिला मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये प्राथमिक उपचारादरम्यान जेव्हा तरुणी शुद्धीवर आली तेव्हा तिला जाणवले की तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे. तिने ताबडतोब महिला डॉक्टरांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.