हाॅटेलमध्ये विनापरवाना बसून दारू पिणे भोवले; अवैध दारू प्रकरणी हाॅटेलमालकांसह ग्राहकांना दंड
By सदानंद सिरसाट | Updated: October 1, 2022 20:36 IST2022-10-01T20:35:16+5:302022-10-01T20:36:06+5:30
हाॅटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्या पाचजणांवर कारवाई करीत तेथून १४५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

हाॅटेलमध्ये विनापरवाना बसून दारू पिणे भोवले; अवैध दारू प्रकरणी हाॅटेलमालकांसह ग्राहकांना दंड
खामगाव (बुलडाणा) : हाॅटेलमध्ये बसून अवैधपणे दारू विक्री केल्याप्रकरणी दोन हाॅटेलमालक तसेच तेथे बसून दारू पिणाऱ्या पाचजणांकडून १ लाख ४ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश चिखली येथील न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी दिला आहे. या प्रकाराने अवैध विक्री करणाऱ्या ढाबा, हाॅटेलमालकांची भंबेरी उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू विक्रीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी चिखली तालुक्यातील पेठ येथील हॉटेल काकाजी ढाबा, चिखली येथील मेहकर फाटा, भानखेड शिवारातील हॉटेल श्रीयोग, हाॅटेल विघ्नहर्ता, मेहकर येथील लोणार रोडवरील हाॅटेल अन्नदाता याठिकाणी छापा टाकण्यात आला.
त्यावेळी हाॅटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्या पाचजणांवर कारवाई करीत तेथून १४५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील व्यक्तींना चिखली कार्यक्षेत्रातील न्यायालयात दोषारोपपत्रासह हजर केले. न्यायदंडाधिकारी एच. डी. देशिंगे यांनी दोन हॉटेलचालकांना प्रत्येकी ४० हजार रूपये दंड, तसेच विनापरवाना असलेल्या हॉटेल/ढाब्यावर मद्य सेवन करणाऱ्या ५ व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. या प्रकरणात १ लाख ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सरकारी वकील व्ही. एम. परदेसी यांनी बाजू मांडली. ही कारवाई बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, भरारी पथक, बुलडाणा व दुय्यम निरीक्षक, मेहकर यांच्या पथकांनी केली. त्यामध्ये चिखलीचे जी. आर. गावंडे, बुलडाणाचे किशोर आर. पाटील, भरारी पथकाचे आर. आर. उरकुडे, मेहकरचे दुय्यम निरीक्षक एस. डी. चव्हाण यांचा सहभाग होता.
उत्पादन शुल्क विभागाकडून अवैधरीत्या हॉटेल/ढाब्यामध्ये दारू विक्री करणारे, मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तीवर सतत कारवाई केली जाणार आहे. अवैध दारू बनविणे, वाहतूक करणे असे प्रकार घडत असल्यास विभागाला माहिती द्यावी.
- किशोर आर. पाटील.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा