राजस्थानच्या उदयपूर येथे पत्नी, मुलांच्या हत्येनंतर पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पतीने आधी पत्नी आणि २ मुलांना मारले. त्यानंतर स्वत: पंख्याला लटकून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. ती वाचून पोलीस सुन्न झाले आहेत.
उदयपूरच्या प्रभात नगर परिसरातील ही घटना आहे. या सुसाईड नोटमध्ये आर्थिक हानीमुळे त्रस्त असल्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यात लिहिलंय की, मी त्रस्त झालो आहे. माझ्याकडे आता कुठलाही मार्ग नाही असा उल्लेख आहे. आर्थिक तणावातून हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. माहितीनुसार, सेक्टर ५ दिलीप चितारा हे त्यांच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. त्यांची पत्नी अलका, ६ वर्षीय मुलगा खुश आणि ४ वर्षीय मनवीर त्यांच्यासोबत होते. दिलीपने आधी दोन्ही मुलांना जेवणातून विष दिले. त्यानंतर पत्नीचा गळा दाबून हत्या केली मग स्वत: गळफास घेत आयुष्य संपवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यांनी घरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दिलीप चितारा यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह खाली पडले होते. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले. त्यानंतर घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने दिलीप चितारा यांनी हे पाऊल उचलल्याचे चिठ्ठीत म्हटले. कोरोनानंतर खूपच आर्थिक ताण कुटुंबावर आला होता. दिलीप यांचे हिरणमगरी येथे जनरल स्टोअरचे दुकाने होते. हे दुकानही त्यांनी भाड्याने घेतले होते.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभर दिलीप यांच्या घरातून काही हालचाल झाली नाही. कुणीही बाहेर आले नाही त्यामुळे पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना शंका आला. त्यांनी दरवाजा ठोठावला परंतु आतून काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. मृत दिलीपचे काका माणक चितारा यांनी जवळपास ६ महिन्यापूर्वी दिलीपने कर्जाचा उल्लेख केला होता असं सांगितले. घर विकून तो कर्ज उतरण्याचे बोलत होता. मात्र त्यानंतर काहीच चर्चा झाली नाही. काही दिवसांपूर्वीही त्यांची दिलीपसोबत भेट झाली मात्र त्यात कर्जाचा कुठलाही उल्लेख झाला नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितले.