दिल्लीमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने आता शाळेतील शिक्षिकेच्या पतीसह सहा जणांना दोषी ठरवलं आहे. मनजीत सेहरावत, एंजल गुप्ता, धर्मेंद्र, दीपक, विशाल उर्फ जॉनी आणि शहजाद सैफी यांना दोषी ठरवलं आहे. सर्व आरोपींनी गुन्हेगारी कट रचण्यात भूमिका बजावली असं न्यायालयाने म्हटलं आहे.
२९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडताना ३८ वर्षीय सुनीता यांची हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. प्राथमिक तपासात महिलेचा पती मनजीत आणि त्याची गर्लफ्रेंड एंजल गुप्ता यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली. मनजीतने एंजलचे सावत्र वडील राजीव गुप्ता यांच्यासोबत मिळून त्याच्या पत्नीला संपवण्याचा कट रचला होता कारण ती त्याच्या प्रेमसंबंधांना विरोध करत होती.
राजीवचा ड्रायव्हर दीपकने त्याचे मामा धर्मेंद्र यांच्या मदतीने विशाल आणि सैफी या दोन शार्पशूटरना याबाबत माहिती दिली. दोघांनीही परिसराची रेकी केली आणि सुनीतावर तीन गोळ्या झाडल्या. मनजीत आणि सुनीता यांच्यात घटस्फोट होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. एंजलला २७ ऑक्टोबर २०१८ रोजी मनजीतसोबत करवा चौथ साजरा करायचा होता. त्यामुळे दोन्ही आरोपींनीआपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि एंजलची इच्छा पूर्ण करण्यासाठी हत्येचा कट रचला.
मोबाईल लोकेशन, बँक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, एफएसएल रिपोर्ट, वाहन आणि संशयास्पद हालचालींच्या आधारे न्यायालयात कट रचल्याचं सिद्ध झालं. शहजाद सैफी आणि विशालकडून जप्त केलेली शस्त्र हत्येत वापरली गेल्याचे सांगण्यात आलं. यानंतर आता सर्वांना दोषी ठरवण्यात आलं आहे.