Delhi Crime:दिल्लीतील द्वारका परिसरात विजेचा धक्का बसून एका व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवे वळण लागणं आहे. पोलिसांनी मृताची पत्नी आणि त्याच्या चुलत भावाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. दोघांनीही झोपेच्या गोळ्या देऊन महिलेच्या पतीला वीजेचा धक्का देऊन मारण्याचा कट रचला होता. इन्स्टाग्राम चॅटवरुन ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पतीचा झोपेच्या गोळ्यांनीही मृत्यू न झाल्याने तिने आरोपीसोबत चॅटिंग केली होती.
करण देव याच्या हत्येला विजेचा धक्का बसल्याचे सांगून पत्नी सुष्मिता देवेने त्याला रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी करणला तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला, पोलीस या प्रकरणात शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत होते. मात्र त्याआधी करणच्या भावाने संशय व्यक्त केल्यानंतर आणि काही महत्त्वाचे पुरावे दिल्यानंतर हादरवणारा प्रकार समोर आला. सुष्मिताच्या फोनवरील इन्स्टाग्राम चॅटवरून पोलिसांना हत्येच्या कटाची माहिती मिळाली.
मृत करण देव हा उत्तम नगरमधील ओम विहार परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. १३ जुलै रोजी त्याच्या कुटुंबाने त्याला माता रूपराणी मगो रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने पोलिसांना वीजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. करणच्या भावाने सुष्मिता आणि चुलत भावावर संशय व्यक्त केला, त्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुष्मिताने करणचे शवविच्छेदन करु नये अशी विनंती केली होती. मात्र पोलिसांनी शवविच्छेदन करुन अहवाल मागवला.
अहवालानुसार करणला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याच्या रक्तात जास्त प्रमाणात ड्रग्ज आढळून आले, ज्यामुळे मृत्यूचे कारण संशयास्पद वाटू लागले. अहवालानंतर पोलिसांचा संशय अधिकच वाढला आणि प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले. इन्स्टाग्राम चॅटच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. करणच्या भावाने आरोपी राहुलचा मोबाईल कामासाठी घेतला होता. त्यावेळी त्याने राहुचले सुष्मिता सोबतची चॅटिंग वाचली आणि त्याला धक्का बसला.
चॅटिंगमध्ये काय सापडलं?
१२ जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. जेव्हा गोळ्यांचा लगेच परिणाम झाला नाही तेव्हा सुष्मिता घाबरली आणि तिने राहुलला मेसेज करायला सुरुवात केली. "गोळ्या घेतल्यानंतर किती वेळात मरतो हे एकदा पाहून घे. त्याला जेवल्यापासून तीन तास झाले आहेत. त्याला उलट्या झाल्या नाहीत, शौचाला झाली नाही, काहीही झालेली नाही. अजून त्याचा श्वास सुरु आहे, काय करायचं असा मेसेज सुष्मिताने केला. त्यावर राहुलने तुला काही कळत नसेल तर त्याला विजेचा धक्का दे असं सांगितले. यानंतर सुष्मिताने त्याला शॉक बांधून कसा देऊ असं विचारलं. राहुलने करणला टेपने बांधायला सांगितले. त्यानंतर सुष्मिताने तो खूप हळू श्वास घेतोय असं सांगितले. यावर राहुलने तुझ्याकडे असलेल्या सर्व गोळ्या त्याला देऊन टाक असं म्हटलं. सुष्मिताने सांगितले की, 'मी त्याचे तोंड उघडू शकत नाही. मी घशात फक्त पाणी ओतू शकते, तू इथे ये, आपण एकत्र मिळून ते त्याला खायला देऊ शकतो, असं म्हटलं.
दरम्यान, कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, सुष्मिता आणि राहुल यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही करणची हत्या केली जेणेकरून ते एकत्र राहू शकतील आणि करणची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतील.