दिल्लीतील वर्षा पंवार ही 23 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. मात्र आता तिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या बिझनेस पार्टनरनेच तिची गळा दाबून हत्या केली. एजन्सीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, हरियाणातील सोनीपतमध्ये महिलेने आत्महत्या केल्याचा संशय होता, परंतु बुधवारी महिलेचा मृतदेह नरेला येथील तिच्याच प्लेस्कूलमध्ये सापडला. आपला बिझनेस पार्टनर सोहन लालसोबच ती प्लेस्कूल सूरू करण्याच्या तयारीत होती.
दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील रहिवासी विजय कुमार यांनी 24 फेब्रुवारी रोजी नरेला पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी 23 फेब्रुवारी रोजी घरातून गेली आणि परत आलीच नाही. महिलेचा घटस्फोट झाला असून ती तिच्या वडिलांसोबत राहत होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, प्लेस्कूल अद्याप सुरू झालेले नाही. त्याच्या बेसमेंटला एक खोली आहे. जिथे ऑफिस म्हणून काम केलं जात असे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार यांनी 24 फेब्रुवारीला त्यांच्या मुलीच्या मोबाईलवर कॉल केला पण तो एका अज्ञात व्यक्तीने रिसीव्ह केला. त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की तो सोनीपतच्या हर्षना गावात रेल्वे ट्रॅकजवळ आहे, जिथे एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ कॉलवर विजय कुमार यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख सोहन लाल म्हणून केली.
मुलीच्या वडिलांनी घरमालकाच्या मदतीने प्लेस्कूलच्या ऑफिसचं शटर उघडलं असता मुख्य डेस्कच्या मागे त्यांच्या मुलीचा मृतदेह दिसला. यानंतर विजय कुमार यांनी स्थानिक पोलिसांना बोलावले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. सोहन लालने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.