नवी दिल्ली:दिल्लीतील फतेहपूर बेरी भागातून दिल्ली पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अजामीनपात्र वॉरंट अंतर्गत एका आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आले असता, आरोपीने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने पोलिस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलिस जखमी झाले असून, त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयाने आरोपी आझमविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी फतेहपूर बेरी पोलिस स्टेशन परिसरातील चंदन होला गावात पोहोचले. पोलिस पथकाला पाहून आझमने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान, आरोपीदेखील पोलिसांना चकवा देत पळून गेला. या घटनेत अनेक पोलिस जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमी पोलिसांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी पोलिस पथकावर काठ्या आणि दगडांनी हल्ला करताना दिसत आहेत. काही महिलादेखील पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.