ओडिशाच्या मयूरभंज परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. याठिकाणी नुआगावात राहणाऱ्या देबाशीष पात्रा याने पत्नी आणि सासूची निर्दयीपणे हत्या केली आहे. हत्येनंतर हे दोन्ही मृतदेह घरामागील बागेत पुरून टाकले. इतकेच नाही तर आरोपीने कुणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी केळीचे झाड लावले.
१५ जुलैला घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. काही गावकऱ्यांनी देबाशीषला त्याच्या बागेत खोदकाम करताना पाहिले होते. ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तपासात पोलिसांनी खोदकाम केलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा तिथे सडलेल्या अवस्थेत २ मृतदेह सापडले. देबाशीषकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच हत्येची कबुली दिली. हत्येचं प्लॅनिंग करून त्याने पत्नी-सासूला संपवले. हत्येपूर्वीच त्याने खड्डा खणून ठेवला होता. हत्येनंतर दोन्ही मृतदेह त्याने गाडून टाकले.
देबाशीष याने पत्नी आणि सासूला दगडाने ठेचून मारले. परंतु हत्येमागे खरे कारण काय हे अद्याप स्पष्ट नाही. प्लॅनिंगनुसार, आरोपी देबाशीषने पत्नी आणि सासूची हत्या केल्यानंतर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार स्वत: पोलीस ठाण्यात केली होती. परंतु त्याच्या नातेवाईकांना देबाशीषवरच संशय होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा काही गावकऱ्यांकडून त्यांना देबाशीषने घरामागे खड्डा केल्याचं कळले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जिथे खड्डा पाडला होता तिथे पुन्हा खोदकाम सुरू केले तेव्हा दोन्ही मृतदेह सापडले.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. देबाशीषची कसून चौकशी केली तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली. १५ जुलैला या दोघींची दगडाने ठेचून हत्या केल्याचे तो म्हणाला. पत्नी-सासू मागील १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत तशी तक्रार त्याने पोलिसांना दिली होती. मात्र चौकशी केली असता या दोघींची हत्या ठरवून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी देबाशीषला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.