Crime News: राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते. राजाच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने राजाची निर्घृण हत्या केल्याचो पोलिस तपासात समोर आले होते. या घटनेला जवळजवळ दोन महिने झाले आहेत. दरम्यान, आता राजाच्या कुटुंबाचा असा विश्वास आहे की, राजाचा आत्मा अजूनही भटकतोय. कुटुंबाने मेघालयातील ज्या ठिकाणी राजाचा मृतदेह सापडला, त्या ठिकाणी पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजाचा भाऊ विपिन मंगळवारी शिलाँगला पोहोचला. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो सोहरातील त्या ठिकाणी जाणार आहे, जिथे राजाचा मृतदेह सापडला होता. त्या ठिकाणी एक पुजा करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. विपिन म्हणाला की, त्याला वाटते राजाचा आत्मा अजूनही भटकतोय. राजाच्या वडिलांनीही काही दिवसांपूर्वी असेच म्हटले होते.
राजाचा मृतदेह कुठे सापडला?२३ मे रोजी राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली होती. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात राजाचा मृतदेह एका दरीत आढळल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. राजा पत्नीसोबत हनीमुनसाठी मेघालयात फिरायला गेला होता. यावेळी पत्नी सोनमने इतर तीन आरोपींसह राजावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे तपासात समोर आले. सध्या सोनमसह सर्व आरोपी तुरुंगात आहेत.