प्रियकराशी संपर्क साधण्यासाठी वशीकरणाचा आधार तरुणीच्या अंगलट; मांत्रिकाकडून 9 लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:12 PM2022-08-23T17:12:26+5:302022-08-23T17:14:16+5:30
Crime News : २७ वर्षीय तरुणी खारघरमध्ये मैत्रिणीसह राहाण्यास असून ती मुंबईतील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
वैभव गायकर
पनवेल - ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीकडून ऑनलाईन ८ लाख ९५ हजाराची रक्कम उकळून तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील २७ वर्षीय तरुणी खारघरमध्ये मैत्रिणीसह राहाण्यास असून ती मुंबईतील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणांमुळे ते तुटले. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र संपर्क होत नसल्याने वशीकरणाचा आधार घेण्याचा तिने प्रयत्न केला व रुखसार नावाच्या महिलेशी संपर्क साधला. तिने खानसाहेब जादुई शक्तीने प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल असे सांगितले. त्यानुसार तरुणीने खानसाहेबशी संपर्क साधला.
खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो व ५० हजार रुपये पाठवून दिले. मात्र खानसाहेबने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून एकूण ८ लाख ९५ हजार रुपये उकळले. इतके पैसे दिल्यानंतर देखील काहीच काम न झाल्याने आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तरुणीने खानसाहेबकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर भामट्याने आपला मोबाईल बंद करून टाकला. त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत सल्लामसलत करून खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खानसाहेबविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोधसुरू केला आहे.