मैत्रीचं नातं,जे अगदी मनापासून निभावलं जातं. मात्र, हक्काने विश्वास ठेवावा अशाच या नात्यात एका मुलीला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या १६ वर्षांच्या मुलीने आपल्या मैत्रिणीवर विश्वास ठेऊन तिचं घर गाठलं. मात्र, तिथे गेल्यावर मुलीसोबत जे घडलं, त्याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. मैत्रीच्या नात्याला काळीमा फसणारी ही घटना छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये घडली आहे.
सरकंडा भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली आहे. ही मुलगी ९ वीत शिकत होती. मात्र, तिला शिक्षणात फारसा रस नसल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडलं. यावरून तिच्यात आणि तिच्या कुटुंबात वाद झाले. या भांडणामुळे मुलीने आपलं घर सोडलं आणि फोन करून ती मैत्रिणीच्या घरी गेली. तिची हीच चूक पुढे तिला महागात पडली.
८ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे तिच्या कुटुंबातील सदस्यांशी भांडण झाले आणि त्यानंतर ती घर सोडून तिच्या मैत्रिणीकडे गेली. जेव्हा अल्पवयीन मुलगी घरातून पळून गेली, तेव्हा कुटुंबाने तिचा जवळपासच्या सर्व भागात शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही. कुटुंबाला वाटले की, त्यांच्या मुलीचे अपहरण झाले असावे, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, ती मुलगी सध्या रायगडमध्ये आहे. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती घरातून पळून गेली तेव्हा ती लिंगियाडीह येथे राहणाऱ्या तिच्या अल्पवयीन मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणी आणि तिच्या आईने पीडितेला गोड बोलून रायगड येथे आणले. तिथे त्यांनी अल्पवयीन मुलीला एका खोलीत बंद केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. तिला दारू पाजल्यानंतर तिला वेगवेगळ्या लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. तिने नकार दिल्यास दोघी मिळून तिला बेदम मारहाण करायच्या. या मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी मैत्रिण, तिची आई आणि वेश्याव्यवसायातील एका आरोपीसह ४ जणांना अटक केली आहे.