रोहतक - दिल्ली आणि हरियाणाच्या सांपला पोलिसांनी काँग्रेसच्या महिला नेत्या हिमानी नरवाल हिच्या मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. बहादूरगड येथे राहणाऱ्या गुन्हेगार सचिनला ३६ तासांनी अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन मोबाईल एक्सेसरीजचं दुकान चालवतो. हिमानी नरवाल हत्याकांडात पोलीस आरोपी सचिनची कसून चौकशी करत आहेत. त्यात हिमानी आणि सचिन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते असं समोर आले. आरोपीकडून हिमानीचे दागिने आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सचिन आणि हिमानी जवळपास १ वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी येत जात होता, कधी कधी तिथे थांबायचा. हिमानीच्या हत्येमागे काय हेतू आहे याचा तपास पोलीस करत आहेत. सचिनने मोबाईल चार्जरच्या तारने हिमानीचा गळा आवळून खून केला. १ मार्च रोजी सकाळी हिमानीचा मृतदेह रोहतकच्या सांपला परिसरातील बस स्टँडवर एका सुटकेसमध्ये आढळला. काही प्रवाशांनी ही अज्ञात बॅग पाहिली आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी सुटकेस उघडताच त्यात हिमानीचा मृतदेह सापडला.
सचिनने लावले ब्लॅकमेलिंगचे आरोप
आरोपी सचिन ती बॅग घेऊन बस स्टँडवर गेला होता. पोलिसांना प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी यांची मैत्री १ वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर हिमानीने सचिनला तिच्या घरी बोलावले होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. हिमानीने या संबंधांचा व्हिडिओही बनवला. हिमानीने याचा वापर करत सचिनला ब्लॅकमेल केले होते. हिमानीला आतापर्यंत ३ लाखाहून अधिक पैसे दिल्याचं सचिनने दावा केला. अद्याप पोलिसांनी या सर्व दाव्याची पुष्टी केली नाही.
दरम्यान, २ मार्चला स्थानिक निवडणुका होत्या. त्याआधी हिमानीने सचिनला पुन्हा घरी बोलावले. त्याठिकाणी हिमानीने सचिनकडे आणखी पैशाची मागणी केली. सचिनने तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने काही ऐकले नाही. त्यावेळी रागाच्या भरात सचिनने हिमानीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर सचिन त्याच्या गावात गेला आणि तिथून पुन्हा हिमानीच्या घरी पोहचला. त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून आधी रिक्षाने मग बस प्रवास करत सांपाला बस स्टँडवर पोहचला तिथे बॅग सोडून तिथून पसार झाला. सचिन विवाहित असून त्याला २ मुलेही आहेत असं पोलीस चौकशीत समोर आले आहे.