लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून विनाकारण बदनामी केल्याचा आरोप करीत एका महिलापोलिसाने तिच्या पतीच्या मदतीने वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची चांगलीच कानशेकणी केली. सोमवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास वाहतूक शाखेच्या इंदोरा कार्यालयात ही खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे बघ्यांनी तेथे मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सावरासावर करीत हे प्रकरण निस्तरले.सदर महिला पोलीस वाहतूक शाखेच्या जरीपटका विभागात कार्यरत आहे. तेथेच नंदू नामक हवालदार काम करतो. महिलेचा पती पोलीस दलातच दुसऱ्या ठिकाणी कार्यरत आहे. महिला आणि तिच्यासोबत वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या नंदूमध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. त्याची कल्पना सोबत काम करणाऱ्या अनेक पोलिसांना आहे. नाजूक वादात कशाला पडायचे, असे सांगून कुणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला. दरम्यान, सोमवारी रात्री ८ च्या सुमारास महिला तिच्या पतीसह वाहतूक पोलिसांच्या इंदोरा कार्यालयात पोहचली. तू मला वारंवार त्रास का देतो, अशी तिने नंदूला विचारणा केली. तर तिच्या पतीने नंदूला पत्नीची विनाकारण बदनामी कशाला करतो, असे विचारले. पती-पत्नीने तेवढ्यावरच न थांबता नंतर नंदूची कानशेकणी केली. वर्दळीच्या ठिकाणी इंदोरा चौकातील कार्यालयात महिला पोलीस सहकारी पोलिसाला मारत असल्याने आजूबाजूच्यांनी तेथे मोठी गर्दी केली. पोलिसही धावले. त्यांनी वरिष्ठांना कळविले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेत प्रकरण समजून घेतले.गैरसमज दूर!महिलेला तक्रारीबाबत विचारणा करण्यात आली. कर्तव्यावरील पोलिसाला मारहाण केल्यामुळे आपल्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, हे महिला आणि तिच्या पतीच्या तर या प्रकरणात विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने दोन्हीकडून तक्रार देण्याचे नाकारण्यात आले. गैरसमज दूर झाल्याचे सांगत त्यांनी प्रकरण संपविले.
नागपुरात महिला पोलिसाकडून सहकाऱ्याची कानशेकणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:36 IST
मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून विनाकारण बदनामी केल्याचा आरोप करीत एका महिला पोलिसाने तिच्या पतीच्या मदतीने वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची चांगलीच कानशेकणी केली.
नागपुरात महिला पोलिसाकडून सहकाऱ्याची कानशेकणी
ठळक मुद्देवाहतूक शाखेत खळबळ : बघ्यांची गर्दी, पोलिसांची सावरासावर