'क्लास वन' अधिकारी १५ हजाराची लाच घेताना जाळ्यात, परवाना नूतनीकरणासाठी घेतली लाच
By विजय.सैतवाल | Updated: February 27, 2024 23:08 IST2024-02-27T23:08:01+5:302024-02-27T23:08:12+5:30
विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर असे आरोपीचे नाव

'क्लास वन' अधिकारी १५ हजाराची लाच घेताना जाळ्यात, परवाना नूतनीकरणासाठी घेतली लाच
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याचे नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, एन. एन. वाघ, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी या पथकाने सापळा रचून सुरळकर याला तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.