सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:35 PM2022-07-24T22:35:22+5:302022-07-24T22:36:39+5:30
पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली.
पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. या दोघांनी चोरलेला माल खरेदी करणा-या एका पानटपरीवाल्याला देखील पकडण्यात आले आहे.
कल्याण पुर्वेतील मनीषा नगर कॉलनीत १५ जुलैला सकाळी १० वाजता सिगारेटची पाकिट पानशॉपवाल्यांना पुरविणा-या व्यक्तीची नजर चूकवून त्याच्या गाडीवरील सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा करीत होती.
दरम्यान या गुन्हयातील आरोपींबाबत गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विनोद सोनवणे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंद रावराणे यांच्यासह हवालदार सोनवणे, बाप्पू जाधव, गोरक्षनाथ पोटे, अमोल बोरकर, पोलीस नाईक महेश साबळे, श्रीधर हुंडेकरी, सचिन वानखेडे, पोलीस शिपाई गोरक्ष शेकडे मिथून राठोड, विजेंद्र नवसारे आदिंच्या पथकाने डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा पेट्रोल पंप लगत असलेल्या किराणा स्टोअर्स परिसरातून गणेश जळगावकर (वय २२) आणि प्रसाद राजगुरू (वय ३२ ) दोघेही रा. दिवा यांना शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सापळा लावून अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी करता कल्याण पूर्वेत सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची कबुली त्यांनी दिली. चोरलेली सिगारेटची पाकिटे त्यांनी ओळखीचा पानटपरीवाला अच्छेलाल साकेत (वय २७) रा. दिवा याला विकली होती हे देखील तपासात उघड झाले. त्यालाही संध्याकाळी साडेसहा वाजता दिवा येथील मंगल मार्केट परिसरातून अटक केली. त्याच्याही चौकशीत जळगावकर आणि राजगुरू यांच्याकडून चोरीची सिगारेटची पाकिटे कमी किमतीत विकत घेतल्याचे समोर आले. या आरोपींनी मागील महिन्यात कल्याण पूर्वेतील चेतना स्कूल परिसरात तर सात दिवसांपुर्वी डोंबिवलीतील सोनारपाडा तसेच दिड महिन्यापुर्वी सागाव आणि शिळ डायघर परिसरात सिगारेटची पाकिटे असलेली बॅग चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात त्यांनी दुचाकीचा देखील वापर केला आहे ती देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी दिली.